Ad will apear here
Next
महिला कामगार करणार गवंडीकामही; प्रशिक्षणाने दिला आत्मविश्वास

पुणे : इमारत बांधकामाच्या ठिकाणी महिला प्रामुख्याने दिसतात त्या ओझी वाहण्याचे काम करताना; पण पुण्यातील काही इमारतींच्या बांधकामाच्या ठिकाणी आता महिला कामगार गवंडीकाम करतानाही दिसणार आहेत. ‘क्रेडाई’तर्फे काही महिलांना त्याचे विशेष प्रशिक्षण देण्यात आले असून, कौशल्यवृद्धीमुळे या कामगारांना कामाचा अधिक मोबदला मिळणार आहे. त्यामुळे या कामगारांच्या चेहऱ्यावर आत्मविश्वासाचे वेगळेच तेज झळकते आहे.

अमनोरा परिसरात एस. जे. काँट्रॅक्टर प्रायव्हेट लिमिटेड यांच्या बांधकाम साइटवरील २६ महिला कामगारांना ‘क्रेडाई पुणे मेट्रो’ची वूमन्स विंग आणि ‘कुशल-क्रेडाई’तर्फे गवंडीकामाचे कौशल्य प्रशिक्षण देण्यात आले. गवंडीकामाचे प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या महिलांची ही दुसरी तुकडी आहे. १० जून रोजी झालेल्या कार्यक्रमात पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते या २६ महिलांना प्रमाणपत्रे व ‘टूल किट’ प्रदान करून त्यांचा गौरव करण्यात आला.


‘आजवर आम्ही बांधकाम साइटवर ओझी वाहण्याचे काम करत होतो; मात्र आता आम्ही गवंडीकामातील बारकावे शिकलो आहोत. बांधकाम आणि प्लास्टर करण्याचे कौशल्य आम्हाला जमू लागले आहे आणि त्याबरोबरच बांधकामाच्या ठिकाणी सुरक्षितता कशी राखायची तेही आम्ही शिकलो आहोत. मेहनत करायला आम्ही तयारच असतो. आता चार पैसे जास्त मिळवून घराला आणखी हातभार लावू शकू याचे समाधान वाटते,’ अशी भावना व्यक्त करताना राजश्रीबाई आणि चाँदबाई यांच्या चेहऱ्यावर आत्मविश्वासाची एक वेगळीच झळाळी होती.

या कार्यक्रमाला ‘क्रेडाई पुणे मेट्रो’चे अध्यक्ष सुहास मर्चंट, ‘क्रेडाई कुशल’चे अध्यक्ष जे. पी. श्रॉफ, अमनोरा-सिटी कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक अनिरुद्ध देशपांडे, एस. जे. काँट्रॅक्टर प्रायव्हेट लिमिटेडचे सुहास व भार्गव जंगले, आनंद कुमार सिंग, ‘क्रेडाई महाराष्ट्र वूमन्स विंग’च्या निमंत्रक अर्चना बडेरा, ‘क्रेडाई पुणे मेट्रो वूमन्स विंग’च्या सपना राठी, ‘क्रेडाई पुणे मेट्रो’चे कामगार कल्याण समिती सदस्य समीर बेलवलकर, पराग पाटील, मिलिंद तलाठी, महासंचालक डॉ. डी. के. अभ्यंकर उपस्थित होते.
 
या वेळी मुक्ता टिळक म्हणाल्या, ‘बांधकाम क्षेत्रातील महिलांच्या प्रगतीसाठी त्यांना कौशल्य प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. त्यामुळे त्यांची मिळकत नक्कीच वाढेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वंचित घटकांचा खास विचार करून अनेक कल्याणकारी योजना सुरू केल्या आहेत. त्याचा लाभ त्यांनी निश्चित करून घ्यायला हवा. अभियंते आणि वास्तुविशारद हे कामगारांच्याच भरवशावर मोठमोठ्या इमारती उभारत असतात. त्यामुळे या व्यक्तींशिवाय देशाची इमारत उभी राहू शकत नाही. कामगारांना लिहिता-वाचता यावे आणि कुणावरही स्वाक्षरी करण्याऐवजी अंगठा उमटवण्याची वेळ येऊ नये, यासाठीही संस्थेने पुढाकार घ्यावा.’

सुहास मर्चंट कामगारांशी बोलताना म्हणाले, ‘तुम्ही प्रशिक्षण कार्यक्रमात जे शिकलात ते इतरांनाही शिकवा. साइटवर असताना स्वतःबरोबरच सोबत काम करणाऱ्यांच्याही सुरक्षिततेसंबंधी काळजी घ्या. आपण जे काम करत आहोत ते असेच का करत आहोत, त्यामागचे कारण काय, याचा विचार करावा आणि प्रश्न विचारावे. म्हणजे तुमची प्रगती होईल. प्रश्न विचारले तरच ज्ञान वाढेल.’

अर्चना बडेरा म्हणाल्या, ‘बांधकाम क्षेत्राला कुशल कामगारांची मोठ्या प्रमाणावर आवश्यकता आहे. महिला कामगारांनाही या क्षेत्रातील संधींचा लाभ घेता यावा आणि त्यांच्या जगण्याची गुणवत्ता वाढावी यासाठी ‘क्रेडाई’च्या वूमन्स विंगतर्फे जाणीवपूर्वक प्रयत्न केले जात आहेत.’  

‘कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रमामुळे आमच्याकडील महिला कामगार नवनवीन कामांचे प्रशिक्षण घेऊन सतत प्रगती करत आहेत आणि नवीन काम शिकायलाही त्या कायम उत्सुक असतात,’ असा अनुभव अनिरुद्ध देशपांडे यांनी सांगितला.

समीर बेलवलकर म्हणाले, ‘यापूर्वी कुशल-क्रेडाईच्या कार्यक्रमांमध्ये प्रशिक्षण घेतलेले पुरुष कामगार पुढे प्रशिक्षक आणि काँट्रॅक्टरदेखील झाले आहेत. आता महिला कामगारही त्या वाटेवर मार्गक्रमण करू शकतील.’
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/AZRCCB
Similar Posts
‘डॅनिश टॅलेंट कँप’ स्पर्धेत पुण्याच्या कामगारांची बाजी पुण्यातील रमजान मोमीन आणि मोहम्मद राबिथ कुन्नमपल्ली या बांधकाम कामगारांनी डेन्मार्कमध्ये नुकत्याच झालेल्या ‘डॅनिश टॅलेंट कँप’ स्पर्धेत आपली चमक दाखवली आहे.
‘बीओसीडब्ल्यू’ तर्फे बांधकाम कामगारांना १९ कोटी रुपयांचे लाभ वितरीत पुणे : ‘‘बीओसीडब्ल्यू’ अर्थात ‘महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळा’मार्फत पुण्यात नोंदणीकृत बांधकाम कामगारांना आतापर्यंत १९ कोटी रुपयांचे लाभ वितरीत करण्यात आले असून, ३४ हजार कामगारांना त्याचा फायदा मिळाला आहे,’ अशी माहिती कामगार विभागाचे अतिरिक्त आयुक्त शैलेंद्र पोळ यांनी दिली.
देवी : एकाच क्षेत्रात कार्यरत असलेल्या कर्तृत्ववान मायलेकींच्या मुलाखती वडिलांचा व्यवसाय पुढे नेणारी मुले बरीच असतात; पण आईचा व्यवसाय पुढे सुरू ठेवणाऱ्यांची संख्या तुलनेने कमी असते. तसेच आईच्या व्यवसायाची परंपरा पुढे नेणाऱ्या मुली तर त्याहूनही कमीच असतात. ही बाब लक्षात घेऊन ‘सुकृति’ने एकाच क्षेत्रात काम करणाऱ्या मायलेकींच्या मुलाखतींची मालिका नवरात्रौत्सवानिमित्त आयोजित केली आहे
पाणी वाहून आणणाऱ्या ‘नीरचक्र’चे वितरण पुणे : ग्रामीण भागात अनेकदा दूरवरून पाणी आणावे लागते. विशेषतः महिलांना खडबडीत रस्त्यांवरून डोक्यावर, कंबरेवर हंडे, कळश्या घेऊन पाणी आणण्याचे अत्यंत कष्टप्रद काम करावे लागते. एकावेळी जास्त प्रमाणात पाणी आणणेही शक्य होत नाही. या अडचणीवर मात करण्यासाठी ‘नीरचक्र’ हा एक अभिनव उपाय विकसित करण्यात आला आहे. ही पाणी वाहून आणणारी ढकलगाडी आहे

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language